Wednesday, August 29, 2018

भारतीय ‘शास्त्रीय’ परंपरेची ओळख

अंधश्रद्धा, जातीपाती, रुढी-परंपरा यात गुरफटलेला, कोणती नवी माहिती सांगितली, की ‘आपल्या पूर्वजांना (रामायण-महाभारत काळात) ही माहिती होतीच, जगाला आता समजली,’ अशा बढाया मारणारा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनापासून पूर्णपणे फारकत घेतलेला समाज, अशीच भारतीय समाजाची, संस्कृतीची ओळख आजच्या नव्या पिढीला झाली आहे. ही ओळख खरी आहे का? अनेकदा ज्या परंपरांचा अभिमानाने आपण उल्लेख करतो त्या परंपरा आपल्याला पूर्णपणे माहीत असतात का? का केवळ भावनिक मुद्‌द्‌यांवर आपण भारताचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचा प्रयत्न करतो? खरा इतिहास नव्या पिढीसमोर योग्य पद्धतीनं मांडला नाही, तर त्याची ओळखच होणार नाही. शास्त्रीय दृष्टिकोन भारतानं कधी जोपासलाच नाही, असा एक आक्षेप नेहमी घेतला जातो. हा आक्षेप काही खरा नाही. प्राचीन काळात आपल्याकडं विविध प्रकारची शास्त्रं निर्माण झाली, विकसित झाली, आपल्याकडून जगभरात पोचली. परंतु, नंतरच्या हजार-बाराशे वर्षांच्या सततच्या परकी आक्रमणामुळं वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास सुटली. भारतीय वैज्ञानिक प्रगतीचे साक्षीदार असलेले ‘मोती’ विखुरले गेले. हे मोती गोळा करून त्यांची माळ करण्याचे प्रयत्न गेल्या सुमारे शंभरवर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहेत. आता त्यालाही शास्त्रीय अधिष्ठान मिळायला सुरवात झाली आहे.


भारताचा वैज्ञानिक प्रगतीत वाटा काय, या प्रश्‍नाची अनेक उत्तरं मिळतील. अलीकडच्या काही शतकात फारसं काही भारतात घडलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, त्याआधीच्या कित्येक शतकांपासून भारतानं जगाला विज्ञानाचा मार्ग दाखवला आहे. विज्ञान आणि गणित या क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेकांची नावं आपल्याला सांगता येतील. रामायण- महाभारतात अनेक गोष्टी आहेत. त्यातून त्यावेळच्या समाजाची माहिती मिळते. त्यात उल्लेखलेल्या अनेक शस्त्र, अस्त्रांचा उल्लेख वाचला, की ते खरोखच अस्तित्वात होतं, असं वाटायला लागतं. परंतु, त्या केवळ ‘वैज्ञानिक कल्पना’ होत्या, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. त्या गोष्टी आपल्याकडं होत्या, याचा कोणताही शास्त्रशुद्ध पुरावा नाही. डॉ. जयंत नारळीकर यांनी याचं सुंदर विवेचन केलं आहे. असं असलं, तरी अतिप्राचीन काळापासून भारतात वैज्ञानिक वारसा होता. विशेषत- गणित, खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्राची प्रगती झाली आणि ही शास्त्रं आपल्याकडून जगभरात गेली, याचे पुरावे आहेत. प्राचीन भारतात वेद रचले गेले, वेद समजून घेण्यासाठी शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त (व्युत्पत्तीशास्त्र), ज्योतिष (आजचं खगोलशास्त्र) आणि कल्प अशी सहा वेदांगं रचली गेली. अनेक ज्ञानशाखांचा उगम या वेदांगातून झाल्याचं दिसून येते. ज्योतिष आणि कल्प या वेदांगांमुळं भारतात गणिताची भरभराट झाली. प्राचीन काळात वेगवेगळ्या आकाराच्या यज्ञवेदी तयार करण्यासाठी, त्यांचा आकार ठरविण्यासाठी भूमितीचा पाया घातला गेला. वेगवेगळ्या मोजमापांसाठी वेगवेगळी गणितं तयार केली गेली. ‘पाय’ची किंमत, वर्तुळाचं क्षेत्रफळ, आयताच्या कर्णाचा वर्ग हा त्याच्या दोन संलग्न बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो (आता आपण याला पायथॅगोरस सिद्धांत म्हणतो) अशा प्रकारची अनेक माहिती प्राचीन ऋषींना होती. त्यांनी तयार केलेली सूत्रे मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली, नंतर लिहिण्याच्या साधनांचा शोध लागल्यानंतर कधीतरी लिहिली गेली. संख्यांच्या बाबतीतही हेच आहे. पूर्णांक, अपूर्णांक, करणी संख्या (सर्ड), संभाव्यशास्त्र (प्रोबॅबिलिटी) यांचा अभ्यास भारतीयांनी केला होता. प्रत्येक वस्तू ही अणू-रेणूंनी बनली असते, हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला तो कणादांनी मात्र खऱ्या अर्थाने तो सिद्ध केला आइनस्टाइन यांनी.

भारताच्या या शास्त्रीय परंपरेचा आढावा आणि काही निवडक भारतीयांच्या कामाचा आढावा अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी ‘भारतीय जीनियस’ या तीन पुस्तकांच्या मालिकेतून मांडला आहे. ‘जीनियस’ मालिकेतील पहिल्या १२ पुस्तकांचं प्रकाशन दोन वर्षांपूर्वी झाले. त्यात सर्व विदेशी शास्त्रज्ञांची ओळख करून देण्यात आली होती. आता त्याच्या पुढची ‘भारतीय जीनियस’ ही मालिका प्रकाशित करण्यात आली आहे. यात आर्यभट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, वहारमिहीर, माधवा, विश्‍वेश्‍वरैया, रामानुजन, डी. डी. कोसंबी, सी. व्ही. रामन, मेघनाद साहा, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, जयंत नारळीकर, जगदीशचंद्र बोस, होमी भाभा, लॉरी बेकर आणि एम. स्वामीनाथन यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. या प्रत्येकाच्या संशोधनाचा विषय वेगळा; पण यांना बांधणारा भारतीयत्वाचा धागा एकच. भारताची वैज्ञानिक परंपरा पुढे नेणारे हे खरे शिलेदार! या सगळ्यांची काळाच्या पुढची दृष्टी पाहून थक्क व्हायला होतं. अवघ्या ३३ वर्षांचं आयुष्य लाभलेला, ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ अशा शब्दांत गौरवला गेलेला आणि त्यानं केलेल्या कामावर अजूनही शेकडो विद्यार्थी पीएचडी करतात, असा रामानुजन एकमेवाद्वितीयच. गणित, स्टॅटिस्टिक्‍स, इंडॉलॉजी, नाणकशास्त्र, इतिहास अशा अनेक क्षेत्रात लीलया संचारणारा, संशोधनात अखंड बुडालेला शास्त्रज्ञ अशी दामोदर ऊर्फ डी. डी. कोसंबींची ओळख. प्रामुख्यानं पुण्या-मुंबईत राहून त्यांनी जागतिक पातळीवरचं संशोधन केलं. विश्‍वेश्‍वरैया यांच्याबद्दल सांगण्यासाठी एखादा ग्रंथही अपुरा पडेल. ‘कुठल्याही देवळात जाऊन नमस्कार करणं मला आवडत नाही. माणसाची सेवा हाच माझा धर्म आणि काम म्हणजेच परमेश्‍वर व काम म्हणजेच माझी देवपूजा’ हे सूत्र शंभर वर्षं उराशी बाळगून अखंड कार्यरत असलेल्या भारतरत्न मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैय्या यांची माहिती वाचून ऊर अभिमानानं भरून येतो. ‘आधुनिक भारताचे विश्‍वकर्मा’ अशा सार्थ शब्दांत त्यांचा गौरव केला जातो. महाराष्ट्रातल्या धुळे, नगर, अक्कलकोट, सांगली, पंढरपूर, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूर या शहरांचा पाणी-प्रश्‍न त्यांनी सोडवला. खडकवासला, भाटघर आणि राधानगरी या धरणांवर स्वयंचलित दरवाजे बसवण्याचं आणि या धरणांच्या मजबुतीकरणाचं श्रेय विश्‍वेश्‍वरैय्या यांनाच आहे. नीरा, मुठा, प्रवरा नद्यांवर ब्लॉक पद्धती उभारण्याचं काम त्यांचंच. ही केवळ त्यांच्या कामाची एक झलक आहे. म्हैसूर विद्यापीठासह देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, शाळा, धरणं, शहरांचा पाणी प्रश्‍न सोडवणं अशी अनेक कामं त्यांनी केली. पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या विश्‍वेश्‍वरैय्या यांना सामाजिक कार्याची प्रेरणाही पुण्यात मिळाली ती टिळक, आगरकर, गोखले, महर्षी कर्वे यांच्याकडून. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख ‘भारतीय जीनियस’मध्ये योग्य पद्धतीनं मांडला आहे.

‘रामन इफेक्‍ट’मुळं संपूर्ण जगाच्या चिरस्मरणात राहिलेल्या सी. व्ही. रामन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे लेखकांनी चांगल्या पद्धतीनं मांडले आहेत. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर हे रामन यांचे पुतणे. दोघांनीही नोबेल पुरस्कार मिळविला. दोघांच्या स्वभावांतही जमीन-आस्मानाचा फरक. पण दोघंही असामान्य बुद्धिमान, संशोधनाची तीव्र तळमळही सारखीच. ‘चंद्रशेखर लिमिट’च्या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळाला; पण जरा उशिरानंच. ‘स्टेडी स्टेट’वरच्या संशोधनानं जगप्रसिद्ध झालेल्या जयंत नारळीकर यांची माहिती वेगळ्या पद्धतीनं मांडली आहे. त्यांच्यातल्या खगोल संशोधकाबरोबरच सर्वांपर्यंत विज्ञान नेणारा प्रचारक हे रूप अतिशय चांगल्या पद्धतीनं पुस्तकात मांडलं आहे. डॉ. नारळीकर यांच्या संशोधनाची सोप्या भाषेतली मांडणी सर्वसामान्य वाचाकाला कळेल अशीच आहे. त्यांनीच उभ्या केलेल्या ‘आयुका’द्वारे त्यांचं काम पुढं नेलं जात आहे.

वनस्पतींना भावना असतात, असं सिद्ध करणारे कविमनाचे जगदीशचंद्र बोस हे विज्ञानकथा लेखकही होते. ‘भारतीय विज्ञानकथेचा जनक’ असं त्यांना म्हटलं जातं. रविंद्रनाथ टागोर हे त्यांच्या लिखाणाचे चाहते होते. भाराताला अणुशक्तीचा मार्ग दाखवणारे डॉ. भाभा, हरितक्रांतीचे उद्‌गाते डॉ. स्वामिनाथन, ‘साहा समीकरणां’मुळं खगोलशास्त्राला वेगळी दिशा देणारे मेघनाद साहा, जन्मानं ब्रिटीश असूनही भारताला कर्मभूमी मानणारे लॉरी बेकर यांची माहिती सर्वांनी वाचावी अशी आहे. विज्ञानाचे विद्यार्थी नसलेल्यांनाही समजेल अशी पुस्तकाची भाषा आहे. या सर्वांचं कर्तृत्व वाचून आपला ऊर अभिमानानं भरून येईल हे मात्र नक्की!

पुस्तकाचं नाव - भारतीय जीनियस (एकूण तीन भाग)
लेखक - अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन (०२०-६५२६२९५०)
पृष्ठं - १४८, १४८, १५२ / मूल्य - ९९ रुपये (प्रत्येकी)

No comments:

Post a Comment