साधेपणा आणि कुतूहल जपणारी अभिनेत्री

सकाळी साडेसातला अभिनेत्री रीमा लागू गेल्याची 'व्हॉट्‌सऍप'वर बातमी आली, तेव्हा मला तर कोणी तरी ती चेष्टाच केलीय असं वाटलं. अलीकडे अशा अनेकांबद्दलच्या अफवा ऐकल्यानं मी ते गंभीरपणे घेतलंच नाही. उलट अशा अफवांपासून सावध राहण्याची सूचना करण्यासाठी मी रीमालाच फोन लावला. पण तो कोणी उचलेना. मग टीव्ही लावला. तेव्हा धस्स झालं. तातडीनं तिच्या घरी गेलो आणि तिचं पार्थिव बघून तोंडातून शब्दच फुटेना. तिच्या चेहऱ्यावर तोच ताजेपणा होता. मन विषण्ण झालं आणि अनेक दशकं मागे गेलं.
ते 1988 साल असावं. शास्त्रीय संगीताशी संबंधित लेखनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी अशोक जैन यांच्या घरी बसलो होते. तिथे रीमा आली होती. योगायोगानेच ओळख झाली; पण पहिल्याच भेटीत तिचा साधेपणा, जिज्ञासा यांची मनावर छाप पडली. मग कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भेटत राहिलो.


मी, सुहास आणि रवी मालदे मिळून ऑटिस्टिक मुलांसाठी 'आशियाना' नावाची एक शाळा सुरू केली होती. तिथल्या एका कार्यक्रमासाठी रीमा आणि अभिनेता अतुल कुलकर्णी हे दोघेही आले होते. मग दोघंही आमच्या घरी आले. त्या वेळी मला आणि शोभाला तिच्यातला साधेपणा खूपच भावला. त्या वेळी मी फारसं काही मराठीतून लेखन केलेलं नव्हतं. जे काही लिहिलं होतं ते इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजीविषयी होतं आणि तेही इंग्रजीतून. पण त्याविषयी तिने जे कुतूहल व्यक्त केलं, तो मला कौतुकास्पद वाटलं. नवं शिकण्याची, जाणून घेण्याची ही जिद्द हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता.

अनंत सामंत यांच्याकडे मी, विश्‍वास पाटील असे काही जण काही वेळा एकत्र जमायचो आणि गप्पा रंगायच्या. अनंत सामंत आणि विश्‍वास पाटील हे दोघं प्रसिद्ध लेखक. मला आधी वाटायचं यात रीमा कशी काय? पण नंतर जसजसं तिचं बोलणं ऐकत गेलो, तसतसा मी थक्क होत गेलो. तिच्या बोलण्यात वाचलेल्या अनेक गोष्टी सहजपणे येत. तिला मराठी साहित्याविषयी इत्थंभूत आणि सखोल माहिती असायची. पु.ल., जी.ए., गौरी देशपांडे, खानोलकर, विंदा करंदीकर, सानिया अशा अनेकांची बरीचशी पुस्तकं तिनं वाचलेली असायची. मी नुकताच बंगळूरला सानियाला भेटून आलो होतो. एक दिवस सानियाची दूरदर्शनवर मुलाखत चाललेली
होती. ती संपल्यावर रीमाचा मला फोन आला. 'माझी सानियाशी ओळख करून देशील का रे?' साहित्यिकांविषयीचा आदर तर त्यातून व्यक्त होत होताच; पण त्यातले कुतूहलही जाणवत होते. मला तिच्या या स्वभाववैशिष्ट्यांची फार गंमत वाटली.
स्वत: एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही साहित्याच्या क्षेत्रावर प्रेम करणारी डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर अशी जी काही मोजकी नावं मी पाहिली आहेत, त्यात रीमाही होती. तिचं वाचन दांडगं होतं. एका संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिची मुलाखत घेताना मी तिला तिच्या वाचनाविषयी प्रश्‍न विचारले आणि त्याविषयी तीही भरभरून बोलली.

एकदा का प्रसिद्धीचे वलय लाभले की अशा सेलिब्रिटींमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये अंतर पडत जातं. रीमाने स्वतःचे तसे कधीही होऊ दिले नाही. रुपेरी पडद्यावर झळकत असतानाही आपण खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहोत, याचा तिला गर्व नसायचा. ती खूपच 'डाऊन टू अर्थ' असायची. ती स्वयंपाकही उत्तम करायची. माझ्या 'किमयागार' या पुस्तकाच्या प्रकाशनाचे संपूर्ण आयोजन तिनेच केले. अगदी या पुस्तकाचे शीर्षकही तिनेच सुचविलं होतं. हॉलचं बुकिंग करण्यापासून अनेकांना आग्रहाचं आमंत्रण देण्यापर्यंत संयोजनात 'सबकुछ रीमाच' होती. लेखक म्हणून माझी ओळख निर्माण करणारं हे पुस्तक असल्यानं रीमाचं स्थान माझ्या मनात मोठं होतं.

एकदा रीमा न्यूयॉर्कला शूटिंगसाठी गेली होती. मीही ऍटलांटावरून न्यूयॉर्कला येणार होतो. मॅनहटनला 2-3 तास आम्ही तिथे मनसोक्त भटकलो आणि एका
मॅकडोनाल्डमध्ये रात्री दोन वाजता कॉफीही प्यायलो. खूपच मजा आली होती. असं किती सांगावं? आज ती आपल्यात नाही यावर विश्‍वासच बसत नाही. 'पुरुष'सारखी अनेक नाटकं आणि 'वास्तव'सारखे अनेक चित्रपट यांच्यातला तिचा अभिनय मला आवडायचा. याचं कारण पूर्वीच्या गरिबीनं पिचलेल्या, सतत दु:खी अशा दुर्गा खोटे, निरुपा रॉय यांनी रंगवलेल्या आईची प्रतिमा रीमानं पूर्णपणे बदलून ती प्रसन्न करून सोडली होती. एक व्यक्ती म्हणूनही ती मला खूप जवळची वाटायची. पाणी फाउंडेशनच्या कामात सहभागी होऊन आपली समाजाप्रती असलेली जाणीव ती व्यक्त करत होती. त्याचा अजिबात गवगवा न करता गेल्या काही वर्षांत मात्र आमचा संपर्क तुटला होता. क्वचित तिच्यात मला नैराश्‍यही दिसायचं. आत काहीतरी जळत होतं हे सतत जाणवायचं. पण आता हेच नैराश्‍य आमच्यात मागे ठेवून ती मात्र खूप दूर निघून गेली हे कसं समजावून सांगायचं स्वत:ला?

No comments:

Post a Comment