मुलांत ध्येयापेक्षा कुतूहल जागवा - अच्युत गोडबोले

'मुलांसमोर ध्येय ठेवून, त्यामागे धावायला लावण्यापेक्षा त्यांच्यातील कुतूहल जागे ठेवा. तेवढे केलेत तरी मुलांनी निम्मी शर्यत जिंकल्यासारखी आहे,' असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक अच्युत गोडबोले यांनी आज व्यक्त केले. संवाद समुपदेशन केंद्रातर्फे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित 'बालक-पालक संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर 'सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी होते. कार्यक्रमाचे संयोजक अर्चना मुळे यांनी स्वागत केले.


गोडबोले म्हणाले, "गुणांच्या शर्यतीतील मुलांचे बाल्य हरवतेय. शिक्षणातील सौंदर्य हरवून रेडीमेड विचारांची सवय लावतेय. शिक्षक स्वतः विद्यार्थी राहिलेच नाहीत. त्यांनी शिकणे थांबवले आहे. जग झपाट्याने बदलत असताना बदल स्वीकारण्याचे संस्कार मुलांवर बिंबवण्याची पहिली गरज आहे. गेल्या दहा वर्षांतील बदल सहस्रकातील सर्वांत वेगवान आहेत. जुन्याला चिकटून बसण्याची वृत्ती सोडून नव्याचा आनंद घेतला पाहिजे. फक्त परीक्षेसाठी अभ्यास, ही संकल्पनाच नको. विषयाची गोडी मुलांना चाखू द्या. घोकमपट्टी, गाईड हवीत कशाला?''

गोडबोले पुढे म्हणाले, "विज्ञान, तंत्रज्ञान सर्वोत्तम, कारण ते पैसे देतात, अशा विचारसरणीत साहित्य, संगीत, चित्रकलेला दुय्यम झालेय. आयुष्य म्हणजे फक्त हिशेब; सर्वांगीण आनंद कुठाय? पालक, शिक्षकांत त्याविषयीची उदासीनता अस्वस्थ करणारी आहे. सृष्टीच्या मूलतत्त्वाविषयी मुलांत कुतूहल दिसू द्या. आपण आत्मकेंद्री, स्वार्थी, चंगळवादी बनलोय. लोक काय म्हणतील याची भीती वाटते, ती भीती मुलांच्या मनात रुजू देऊ नका.''
शाल्मली वझे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर माधवी ठाणेकर यांनी परिचय करून दिला. डॉ. प्रांजली माळी यांनी आभार मानले. मानसी लागू, सुधा पाटील, तन्मय शेडबाळे आदींनी नियोजन केले कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

मराठी संवादभाषा  अच्युत गोडबोले म्हणाले, ""मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, हा प्रयत्न मी करतोय; त्याचा मूळ हेतू भाषेची मूलतत्त्वे लोकांत पोचवण्याचा आहे. ही संवादभाषा व्हावी, हाच प्रयत्न आहे.''

No comments:

Post a Comment