कविमनाचा थोर वैज्ञानिक (अच्युत गोडबोले, दीपा देशमुख)

‘वनस्पतींनाही संवेदना असतात’, असा महत्त्वपूर्ण शोध लावणारे विख्यात वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांचं याशिवायही आणखी दोन क्षेत्रांत मोठं योगदान आहे. एक म्हणजे मिलिमीटरमध्ये तरंगलांबी असणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी निर्माण करण्याच्या पद्धतीचा शोध आणि दुसरं म्हणजे, हेन्‍रिक हर्ट्‌झ यांनी रचना केलेल्या विद्युत चुंबकीय लहरींचं अस्तित्व शोधणाऱ्या ‘कोहरर’ नावाच्या उपकरणात त्यांनी केलेल्या मूलभूत सुधारणा! ‘भारतीय जिनिअस’ असलेल्या या जगद्विख्यात वैज्ञानिकाच्या कार्याची ही ओळख...


भौतिकशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र यांच्यातल्या नेत्रदीपक संशोधनामुळं डॉ. जगदीशचंद्र बोस (३० नोव्हेंबर १८५८-२३ नोव्हेंबर १९३७)
यांना सगळं जग ओळखतं. बोस यांनी वनस्पतिविश्‍वात मौलिक संशोधन करून ‘वनस्पती सजीव असतात’, हे जगाला पहिल्यांदा दाखवून दिलं! ब्रिटिश सरकारनं बोस यांना ‘सर’ या किताबानं सन्मानित केलं. भारतात संशोधनाला चालना मिळावी म्हणून त्यांनी कलकत्ता (सध्याचं नाव ः कोलकता) इथं ‘बोस इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली आणि ती संस्था देशाला समर्पित केली. बोस यांनी भारतीय विज्ञान परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं. सन १९३१ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचा सत्कार करून ‘आचार्य’ ही पदवी त्यांना दिली.

रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय अशी अनेक थोर मंडळी बोस यांची समकालीन होती. त्या वेळी देशात विज्ञानाच्या शोधाबद्दल अतिशय निष्क्रियता आणि उदासीनता होती. बोस यांचं कार्य किती अनमोल होतं, हे त्या वेळची परिस्थिती पाहता लक्षात येतं. बोस यांचं महत्त्वाच्या दोन क्षेत्रांत योगदान आहे. एक म्हणजे मिलिमीटरमध्ये तरंगलांबी असणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी निर्माण करण्याच्या पद्धतीचा शोध आणि दुसरं म्हणजे, हेन्‍रिक हर्टझ यांनी रचना केलेल्या विद्युतचुंबकीय लहरींचं अस्तित्व शोधणाऱ्या ‘कोहरर’ नावाच्या उपकरणात त्यांनी केलेल्या मूलभूत सुधारणा!

बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी बांगलादेशातल्या (पूर्वीचं पूर्व बंगाल) ढाका जिल्ह्यातल्या राणीखल या छोट्याशा गावात मेमनसिंह या भागात झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र हे फरीदपूर इथं सरकारी नोकरीत अधिकारी होते. बोस यांची आई बामसुंदरी ही अतिशय प्रेमळ गृहिणी होती. लहानग्या जगदीशचंद्रला निसर्गातल्या अनेक गोष्टींचं कुतूहल वाटत असे आणि वडील भगवानचंद्र हे मुलाच्या ‘का?’ या प्रश्‍नाला कधीही कंटाळत नसत. आपल्या मुलाचं कुतूहल नेहमीच जागतं राहिलं पाहिजे, याची जाणीव त्यांना होती. ‘सगळी झाडं एकाच वेळी फुलं का देत नाहीत?’ ‘प्रत्येक झाडाच्या पानाचा हिरवा रंग वेगवेगळा का असतो?’ असे अनेक प्रश्‍न विचारून आपल्या वडिलांना जगदीशचंद्र भंडावून सोडी. त्या वेळी मुलांना इंग्लिश शाळांमध्ये शिकायला पाठवणं प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात असे. मात्र, ‘इंग्लिश माध्यमाच्या खोट्या गर्वामुळं माणूस इतरांपासून स्वतःला वेगळा समजायला लागतो; त्यामुळं आपल्या मुलानं सगळ्यांमध्ये राहून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालं पाहिजे आणि मुलाचा सहज आणि स्वाभाविक विकास मातृभाषेच्या वातावरणातच जास्त चांगला होतो,’ असं भगवानचंद्र यांचं मत होतं.

शालेय शिक्षण झाल्यानंतर बोस यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शाखेत प्रवेश घेतला.  कलकत्त्याच्याच केंब्रिज केमिल्टन या विश्‍वविद्यालयातून त्यांनी एमए केलं. ‘तुम्ही तुमच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवावं,’ असा सल्ला प्राध्यापकांनी भगवानचंद्र यांना दिला. त्या काळी परदेशी जाणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. बोस यांच्या आईनं दागिने विकून त्यांचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा केला. इंग्लंडला पोचताच त्यांचा वैद्यकशाखेतला अभ्यास सुरू झाला; पण तिथल्या प्रयोगशाळेत येणाऱ्या विशिष्ट वासाची ॲलर्जी झाल्यानं लंडन विद्यापीठातलं वैद्यकशाखेचं शिक्षण बोस यांना अर्धवट सोडून द्यावं लागलं. पुढं नंतर केंब्रिजच्या ख्राईस्ट महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र असे विषय घेऊन त्यांनी अभ्यास केला. केंब्रिज आणि लंडन विद्यापीठातून पदव्या प्राप्त करून बोस भारतात परतले.

भारतात परतल्यावर ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या तासाच्या वेळी पुढच्या बाकावर बसायला जागा मिळावी म्हणून सगळे विद्यार्थी धडपडत असत. आपल्या घराच्या एका भागात बोस यांनी छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती.

दिवसभर महाविद्यालयात शिकवून घरी परतल्यावर तिथं त्यांचं संशोधन चाले. प्रयोगशाळेत लागणारी अनेक उपकरणं त्यांनी स्वतःच बनवली होती. ‘कोहरर’ नावाच्या विद्युतलहरीशोधक यंत्रात बोस यांनी महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. याच दरम्यान त्यांनी ‘ऑन पोलरायजेशन ऑफ इलेक्‍ट्रिक रेज्‌ बाय डबल रिफ्रॅक्‍टिंग क्रिस्टल्स’ नावाचा पहिला शोधनिबंध लिहिला. सन १८९५-९६ मध्ये लंडन विद्यापीठानं त्यांना डॉक्‍टरेट दिली.

बोस हे अतिशय शिस्तशीर होते. ‘शिस्तीमुळं माणसाला कामं वेळेवर करायची सवय लागते,’ असं ते म्हणत. अगदी लहानसहान गोष्टीतही बोस यांचा कलात्मक स्वभाव दृष्टीस पडत असे. जेवताना ताटात वाढलेले पदार्थ कशा रीतीनं वाढले आहेत, याकडंही त्यांचं विशेष लक्ष असायचं. मनमिळाऊ स्वभावामुळं बोस यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. विनोदी किश्‍शांचा भरपूर साठा बोस यांच्याकडं होता. आपल्या गोष्टीत ते अनेक विनोद पेरत असत. जातिभेदाला त्यांच्याकडं थारा नव्हता. मानवता आणि माणुसकी, हीच मूल्यं त्यांच्या लेखी सर्वश्रेष्ठ होती.

रेडिओतरंग ‘डिटेक्‍ट’ करण्यासाठी एका सेमीकंडक्‍टर जंक्‍शनचा उपयोग करणारे बोस हे पहिले वैज्ञानिक होते. त्यांनी या पद्धतीमध्ये अनेक मायक्रोव्हेव कॉम्पोनंट्‌सचे शोध लावले. त्या वेळी गुग्लील्मो मार्कोनी आणि ऑलिव्हर लॉज हे शास्त्रज्ञदेखील या विषयावर काम करत होते. मार्कोनी यांच्या आधीच, म्हणजे सन १८९५ मध्येच, बोस यांनी ‘रेडिओतरंग पक्‍क्‍या भिंतीतून आरपार जाऊ शकतात,’ हे जाहीरपणे प्रयोग करून दाखवून दिलं होतं. बिनतारी संदेशयंत्रणेचे संशोधक म्हणून मार्कोनी यांची प्रशंसा आज अनेक विदेशी ग्रंथांतून केली जाते; पण या संशोधनाचं खरं श्रेय मात्र बोस यांनाच जातं! ‘एन्सायक्‍लोपीडिया ब्रिटानिका’ या ग्रंथात हर्टझ, लॉज आणि बोस यांच्याही योगदानाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बोस यांनीच पी-टाईप आणि एन-टाईप सेमीकंडक्‍टर यांच्या अस्तित्वाचं भाकीत केलं होतं. आजचा रेडिओ, टीव्ही, रडार, भूतलीय संचार रिमोट सेन्सिंग, मायक्रोव्हेव आणि इंटरनेट या क्षेत्रातल्या प्रत्येकाला बोस यांचं आजन्म ऋणी राहावं लागेल.

यानंतरच्या काळात बोस यांनी वनस्पतिशास्त्राकडं मोर्चा वळवला. ‘वनस्पतींना संवेदना असतात’, याचबरोबर ‘सजीव आणि निर्जीव यांच्यातल्या सीमारेषा खूपच धूसर असतात,’ असं त्यांच्या लक्षात आलं. आपल्या शरीरावर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया वनस्पतीदेखील प्रकट करून दाखवतात, हे दाखवण्यासाठी त्यांनी ‘ऑप्टिक लिव्हर’ नावाचं एक यंत्र तयार केलं. ‘अन्नामधली जीवनसत्त्वं, अमली पदार्थ आणि अल्कोहोल किंवा विष यांचा जसा मनुष्यप्राण्यावर परिणाम होऊ शकतो, तसाच तो वनस्पतींवरही होतो,’ असा निष्कर्ष बोस यांनी मांडला. बोस यांनी काढलेल्या निष्कर्षाची त्या काळी परदेशातल्या काही शास्त्रज्ञांनी खूप टिंगल केली.

‘आमच्यासमोर एखाद्या वनस्पतीला विष देऊन गलितगात्र करून दाखवा, तरच आम्ही तुमचा शोध खरा समजू’ असं आव्हानही बोस यांना देण्यात आलं. बोस यांच्या जागी अन्य कुणी संशोधक असता तर तो अशा आव्हानानं गडबडून गेला असता; पण बोस यांचा स्वतःवर आणि स्वतःच्या संशोधनावर अपार विश्‍वास होता. त्यांनी हे आव्हान शांतपणे स्वीकारलं. ठरलेल्या वेळी शेकडो लोक जमा झाले. ‘आता काय होतंय’ याची सगळ्यांना उत्कंठा होती. विरुद्ध गटातल्या शास्त्रज्ञांनी बोस यांच्या हाती विषाची पूड ठेवली. बोस यांनी ती विषाची पूड वनस्पतींना घातली; पण बराच वेळ होऊनही वनस्पतींवर कुठलाच परिणाम दिसला नाही. त्या पूर्वीप्रमाणेच टवटवीत दिसत होत्या. ‘बोस हे फसवे आणि खोटारडे आहेत,’ अशी हेटाळणी करून जमलेले लोक आणि शास्त्रज्ञ त्यांची हसून हसून खिल्ली उडवायला लागले. ‘‘विषा’चा वनस्पतींवर परिमाण झालेला नाही, याचा अर्थ ती पूड म्हणजे विष नसावंच,’ असा विचार बोस यांच्या मनात क्षणभरात तरळून गेला.

गलका करणाऱ्या जमावाला बोस यांनी शांत केलं आणि ‘या प्रयोगासाठी विष म्हणून माझ्या हाती जी पूड देण्यात आलेली आहे, ती पूड म्हणजे विष नव्हेच,’ असं उपस्थित शास्त्रज्ञांना त्यांनी शांतपणे सांगितलं. बोस हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर शिल्लक राहिलेली ‘विषा’ची पूड त्यांनी लगेचच तोंडात टाकली! ‘हे जर विष असेल, तर माझा मृत्यू होईल,’ असं ते म्हणाले. जमलेले लोक श्‍वास रोखून पाहू लागले. बोस आता क्षणार्धात कोसळतील, असंच लोकांना वाटत होतं; पण तसं काहीच झालं नाही. कारण, त्या शास्त्रज्ञांनी विषाऐवजी मुद्दामच साखरेची पूड आणलेली होती. लोकांसमोर खरा प्रकार उघडकीस आला. आता मात्र टिंगलटवाळी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या माना शरमेनं खाली झुकल्या. बोस यांची आणि जमलेल्या लोकांची त्यांनी जाहीर माफी मागितली आणि ते तिथून चालते झाले.

बोस यांना ‘बंगाली विज्ञानकथेचा जनक’ असं संबोधलं जातं. आपला विज्ञानविषयक कथासंग्रह टागोर यांना भेट देताना बोस म्हणाले होते ः ‘‘तेजानं तळपणाऱ्या ‘सूर्या’लाही एका ‘काजव्या’ची छोटी भेट’’! त्यावर बोस यांना टागोर म्हणाले होते ः ‘‘तू जर विज्ञानाच्या क्षेत्रात पडला नसतास तर सरस्वतीनं तुझ्या हातून उत्तमोत्तम साहित्यकृती लिहून घेतल्या असत्या.’’ पाश्‍चिमात्यांना टागोर यांची प्रतिभा ठाऊक व्हावी, यासाठी बोस यांनी टागोर यांच्या साहित्याचं भाषांतर करून ते प्रसिद्ध केलं. त्यामुळंच टागोर यांची प्रतिभा जगाला ज्ञात झाली.

सन १९१५ मध्ये बोस प्राध्यापकपदावरून निवृत्त झाले; पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. ता. २३ नोव्हेंबर १९३७ रोजी हृदयक्रिया बंद पडल्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं केवळ विज्ञानविश्वातच नव्हे; तर साहित्यप्रांतात, काव्यविश्वातही दुःखाचं सावट पसरलं.

त्यांच्या मृत्यूनंतर मायकेल सॅंडलर म्हणाले होते ः  ‘‘जगदीशचंद्र बोस हे केवळ वैज्ञानिकच नव्हते, तर ते कवीही होते. कवी शेले जर त्यांच्या काळात असता, तर बोस यांच्याकडं बघून तो चक्क विज्ञानाकडं वळला असता!’’ केंब्रिजमधल्या ख्राईस्ट कॉलेज युनिव्हर्सिटीत बोस यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे. भारत सरकारनंही त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपालतिकीट काढलं होतं. बोस यांच्या देणगीमूल्यातून आजही शास्त्रीय आणि सामाजिक कार्य पार पाडली जातात. बोस यांचे विद्यार्थी मेघनाद साहा आणि सत्येंद्रनाथ बोस (एस. एन. बोस) यांनी भौतिकशास्त्रज्ञ म्हणून गुरूचं कार्य पुढं नेलं आणि आपल्या कार्यानं जगात भारताची मान उंचावली!

No comments:

Post a Comment