Wednesday, August 29, 2018

न्यूटन, गॅलिलिओसारखे सूर्य पुन्हा होणे अवघड

 साधारणः एक लाख वर्षांपूर्वी माणसाचा जन्म झाला. त्या वेळी पडलेल्या "का?' या प्रश्‍नाने माणसाने मोठी प्रगती साधली. आयआयटीत शिकताना भेटलेल्या माणसांमधून माझ्यात लिखाणाची बिजे रोवली गेली. त्यातून विज्ञानासह अन्य विषयांवर लिहीत गेलो. "जीनियस', "किमयागार' या पुस्तकांनी वेगळी ओळख मिळवून दिली. महान शास्त्रज्ञ न्यूटन, गॅलिलिओ, आइनस्टाईन यांच्या कामगिरीने खरोखर डोळे दीपतात. त्यांच्यासारखे सूर्य पुन्हा होणे अवघड आहे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांनी  व्यक्त केले.


(कै.) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक केंद्रातर्फे राज्याचे शिल्पकार (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या 32 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला "जग बदलणारे जीनियस' या विषयावर झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्‍वास ठाकूर, सचिव डॉ. मनोज शिंपी आदी उपस्थित होते.

एकविसाव्या शतकात मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाच्या दिशा बदलत असून, ती जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करीत आहे. तसेच माहिती, उपयुक्तता व नव्या अनुभवाच्या शोधात तंत्रज्ञानाभिमुख होत असल्याची माहिती श्री. गोडबोले यांनी दिली. त्यांनी "जीनियस', "किमयागार' या पुस्तकांच्या वाचनापासून 12 लोक आत्महत्येपासून परावृत्त झाल्याचे सांगितले.

ज्येष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. दीपा देशमुख यांनी व्याख्यानात विदेशी शास्त्रज्ञांसह आर्यभट्ट, भास्कराचार्य, डॉ. होमी भाभा, डॉ. स्वामीनाथन ते जयंत नारळीकर, सर विश्‍वेसरय्या यांचाही आदराने उल्लेख केला. संस्थेचे सचिव मनोज देशपांडे यांनी श्री. गोडबोले यांचा परिचय करून दिला. केंद्राच्या सदस्या कविता कर्डक यांनी डॉ. देशमुख यांचा सत्कार केला. दरम्यान, गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य सभागृहात झालेल्या व्याख्यानास ज्येष्ठांसह चिमुरड्यांची मोठी गर्दी झाल्याने आयोजकांना सतरंजीची व्यवस्था करावी लागली.

No comments:

Post a Comment