नेमकं अडतंय कुठे?

मुळात नीट अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, हेच अनेकदा मुलांना समजलेलं नसतं आणि मग आपल्या परीने प्रयत्न करूनही उत्तम मार्क्‍स मिळत नाहीत. त्यामुळे मूल, पालक आणि शिक्षक असे सगळेच हताश होतात. अशा वेळी मुलाच्या शिकण्यात नेमके कोणते अडसर येताहेत आणि ते नेमकं अडतंय कुठे, हे तपासून पाहणं फार महत्त्वाचं ठरतं.
एखादा विषय मुलाला जमत नाही, त्याला त्या विषयात मार्क्‍स मिळत नाहीत, असं लक्षात आलं की त्याला सहसा काही ठराविक सल्ले मिळतात-
‘‘आता अभ्यासाला लाग, इकडे तिकडे भटकणं, टीव्ही पाहणं बास झालं,
पुढच्या वेळेस तुला आणखी मेहनत करायला हवी.’’,
‘‘आता तरी जरा गंभीर व्हा आणि लागा कामाला!’’
‘‘आता तरी जरा नीट अभ्यास कर!’’
बऱ्याचदा मूल त्याच्या बाजूने प्रयत्न करतंही. पण नीट अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, हे बऱ्याचदा त्याला समजलेलंच नसतं. मूल मग बहुतेक वेळा पाठांतराचा आश्रय घेतं आणि प्रश्नोत्तरं पाठ करू लागतं. काही वेळा त्यातून मार्क्‍स मिळूनही जातात, पण अनेकदा हा मार्ग काही चालत नाही. मुळातच विषय समजलेला नसतो, त्यामुळे त्याच प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा होत राहतात.
यातून मूल, पालक आणि शिक्षक अशा सगळ्याच आघाडय़ांना हताश वाटत राहतं. नेमकं काय करावं, हे कळत नाही आणि ते त्यामुळे आलेल्या काळजी, चिडचिड आणि हताशपणातून मोठय़ांचे हे असे उद्गार येतात. यातून मूल नाउमेद होण्यापलीकडे फारसं काही साध्य होत नाही. अशा वेळी त्याच्या शिकण्यात नेमके कोणते अडसर येताहेत आणि ते नेमकं अडतंय कुठे हे तपासून पाहणं फार महत्त्वाचं असतं. स्वत: नाउमेद झालेलं मूल बऱ्याचदा स्वत:चं नेमकं कुठे चुकतं आहे, याचा अदमास घेण्याच्या मन:स्थितीत नसतं. त्यामुळे अशा वेळी मोठय़ांची मदत मोलाचं काम करू शकते. एखादी गोष्ट जमत नाही, म्हणजे एकुणातच जमत नाही, की त्यातले काही भाग जमताहेत, काही जमत नाहीत, याचं भान मुलांबरोबर वावरणाऱ्या मोठय़ांना असणं फार आवश्यक असतं.
आपण एक उदाहरण पाहू. एखादी व्यक्ती मुंबईपासून निघून पुण्यापर्यंत पोहोचायची आहे. ठराविक वेळात ती तिथे नाही पोहोचली, तर आपण काय करतो? जमलं तर तिच्याशी संपर्क साधतो, ती कुठपर्यंत पोहोचली आहे, हे पाहतो. प्रवासात काही अडचण, अडथळा आला नाही ना हे पाहतो. एक्स्प्रेस वे संपून ती व्यक्ती हिंजवडीच्या सिग्नलपाशी ट्रॅफिक जॅममध्ये बराच वेळ अडकली असेल तर इथे वेळ जाऊ शकतो, याची खूणगाठ बांधतो. पुढच्या वेळी या सगळ्याचा विचार करून प्रवासासाठी किती वेळ लागू शकेल याचा वेगळा अंदाज करतो.
अभ्यासाच्या बाबतीतही हेच करायचं. मूल पोहोचायच्या ठिकाणापर्यंत आलं नसेल (अभ्यासाच्या बाबतीत ‘पोहोचायचं ठिकाण’ म्हणजे अपेक्षित उत्तर) तर ते कुठपर्यंत पोहोचलं आहे, याचा अंदाज घ्यायचा. यासाठी मुळात या अभ्यासाच्या प्रवासातले टप्पे ओळखता येणं खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक विषय जमायला वेगवेगळी कौशल्यं लागतात, त्यामुळे अडायच्या जागा वेगवेगळ्या असू शकतात. ‘‘अ अभ्यासाचा’’मध्ये आपण साधारण सातवी-आठवीपर्यंतच्या मुलांना (मुलाचं वय ११ -१२ पर्यंत) अभ्यासात कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे पाहणार आहोत. आजच्या लेखात आपण भाषा विषयाशी संबंधित अडथळे कुठे आणि कसे येऊ शकतात, हे पाहूया.
लेखन, वाचन आणि भाषेचा वापर करून विचार मांडता येणं, ही मूलभूत भाषा कौशल्यं आहेत. खरं तर सगळ्याच विषयांच्या अभ्यासासाठी ही लागतात. लेखन, वाचन कच्चं असेल तर एकंदर शाळेचा अभ्यासच कठीण जातो. अनेकदा मुलांची पहिली दुसरी पार पडली की, त्यांना नीट लिहिता-वाचता येतं, असं गृहीत धरलं जातं. पण अनेकदा या महत्त्वाच्या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष झालेलं असतं आणि त्याचे परिणाम मुलांना कायमच भोगावे लागतात. त्यामुळे याबाबतीत लहान वयातच काय करता येईल, हे आपण स्वतंत्र लेखात पाहू. आज आपण दीघरेत्तरी (वर्णनात्मक-डिस्क्रिप्टिव्ह) प्रश्नांच्या बाबतीत काय होऊ शकतं हे पाहूया. हा मुलांच्या वाटेतला मोठा अडसर असतो. भाषा वापरून विचार मांडता येतात का, याचा मोठा कस या प्रश्नांमध्ये लागतो. त्यात शिक्षण मातृभाषेत होत नसेल तर हा अडसर आणखीनच गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
दीघरेत्तरी प्रश्न लिहायची सुरुवात तशी चौथीपासून होते, म्हणून चौथीच्या इतिहासाचं उदाहरण पाहू. शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना खूप आवडतो. ऑडिटरी, व्हिज्युअल आणि केनेस्थेटिक अशा तिन्ही लर्निग स्टाइलच्या मुलांना गोष्टरूपात तो सांगताही येतो. पावनखिंडीत काय झालं, या प्रश्नाचं उत्तर बहुतेकांना जमतं. पण पावनखिंड इतिहासात अमर का झाली? असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा मुलं गोंधळून जातात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. सुरुवात कशी करायची हेच कळत नाही, म्हणून उत्तर लिहिणं अवघड जातं.
ऑडिटरी मंडळी सगळे संदर्भ छान धाडधाड सांगून मोकळी होतात, पण त्यांच्या लिहिताना चुका होऊ शकतात. व्हिज्युअल मुलांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग असतो, पण तो या प्रश्नाशी जोडून कसा घ्यायचा हे कळत नाही, म्हणून त्यांना लिहिणं अवघड जातं. केनेस्थेटिक मुलांना लढाई कळलेली असते, पण त्याचं नीट वर्णन करून सांगता
येत नाही. अशा वेळी मुलाला हे अवघड जातं आहे, हे पालक किंवा शिक्षक म्हणून स्वीकारता येणं,
ही पहिली महत्त्वाची बाब. त्यानंतर आपण त्यांना कशी मदत करू शकतो? आपण त्यांना काही
प्रश्न विचारू शकतो. अर्थात मुलांबरोबर नेहमीच ध्यानात ठेवायची गोष्ट म्हणजे सोपी, सुटसुटीत भाषा वापरणं आणि लांबलचक पल्लेदार वाक्यं टाळणं. उदाहरणार्थ:
०    पन्हाळगड ते विशाळगड हा प्रवास कसा होता?
०    वाटेत त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या?
०    कमी सैन्य जवळ असतानाही खिंड लढवायचं बाजीप्रभूंनी का ठरवलं?
०    अमर होणं म्हणजे काय?
०    बाजीप्रभूंच्या कोणत्या गुणामुळे आपण त्यांची आजही आठवण काढतो?
या प्रश्नांची उत्तरं सुरुवातीला कदाचित अगदी नेमकेपणे मुलांना देता येणार नाहीत. ज्यांना भाषा सहजगत्या जमत नाही, अशांना बऱ्याचदा एक मदतीचा हात लागतो. नेमक्या उत्तराच्या अट्टहासातून तो मिळत नाही. उत्तरं मिळवण्यापेक्षाही भाषेशी जवळीक साधण्यासाठी आपण हे करतो आहोत, याचं भान पालक किंवा शिक्षकाला असणं हा यातला कळीचा मुद्दा आहे. याच्या पुढचा टप्पा म्हणजे याच पाठावर वेगवेगळ्या प्रकारे कोणते प्रश्न तयार करता येतील, हे मुलांनाच विचारणं.
मूल अडत असेल तर उत्तर तयार करताना महत्त्वाचे शब्द लिहून ठेवणे (फळ्यावर किंवा वहीत), ते समोर ठेवून वाक्य तयार करायला प्रोत्साहन देणे या गोष्टींनी खूप फरक पडतो. या प्रकारात शिक्षक किंवा पालकाचं काम थोडं वाढतं. पण कोणीतरी आपल्या अडचणी समजून मदत करतं आहे, याने मुलांना फार दिलासा वाटतो. केवळ पाठांतर टाळायचं असेल तर आणि पुढे जायचा प्रयत्न मुलांनी आपणहून करायला हवा असेल, तर ही सकारात्मकता फार जरुरी असते.
सततच्या सरावाने मुलांना हळूहळू या गोष्टी जमू लागल्या की, मग त्यासाठी पालक किंवा शिक्षकांना फार वेळ द्यावा लागत नाही. पण     या सगळ्यासाठी हाताशी वेळ असणं आवश्यक असतं. म्हणून जितक्या लवकर अशा प्रकारे अभ्यास सुरू होईल तितका तो शांतपणे करता येईल. म्हणून लहान वर्गापासून तो सुरू होणं केव्हाही श्रेयस्कर.
अशीच अडचण मुलांना कवितेचा भावार्थ समजून घेताना येते. मुलांना कवितेचा शब्दश: अर्थ कळतो, पण त्यापलीकडे कवीला काय सुचवायचं आहे, हे सांगणं कठीण जातं. अशा वेळी कवितेत फार उदाहरणं, दाखले दिले, तर केनेस्थेटिक आणि व्हिज्युअल मुलांचा फोकस ढळू शकतो. म्हणून केवळ एकमार्गी (शिक्षक किंवा पालकाकडून केलं जाणारं) स्पष्टीकरण टाळून मुलांना बोलतं करणं आवश्यक असतं. सातवीच्या मराठीच्या पुस्तकात ‘बिनभिंतीची शाळा’ नावाची कविता आहे. यात कवी ग. दि. माडगूळकरांनी निसर्ग ही कशी बिनभिंतीची शाळा आहे, याचं सुरेख वर्णन केलं आहे. या कवितेच्या संदर्भात  ‘बिनभिंतीची शाळा’ आणि ‘भिंतीची शाळा’ यातला फरक सांगा’, हा प्रश्न मुलांना जरा कठीण जातो. अशा वेळी छोटे छोटे प्रश्न विचारणे आणि त्यांच्या उत्तराशी संबंधित शब्द काढून घेणे हे आलंच. ‘हिंडू ओढे, धुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ, चिडत्या डसत्या मधमाश्यांशी जरा सामना करू..’ अशा ओळींमधून कोणतं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं? इथे नुसतं मधमाश्या म्हटलं असतं तर कोणतं चित्र समोर आलं असतं? ‘चिडत्या डसत्या’ या शब्दांमुळे आणखी काही वेगळं चित्र समोर उभं राहतं का? अशा व्हिज्युअल क्लूजमुळे खूप फरक पडू शकतो. मग ‘चिडत्या डसत्या हे शब्द कवीने का वापरले असावेत, याचा अंदाज करता येतो का?’ या प्रश्नाचं उत्तर हातात गवसायला वेळ लागत नाही.
भाषाविषयक अडचणींचा मोठा टप्पा म्हणजे निबंध लेखनाचा. मुलांना बहुतेक वेळा निबंध लिहायचा कंटाळा असतो. त्यात निबंधाचे वेगवेगळे विषय, ते लिहिण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे नेमकं काय लिहायचं आहे, हे त्यांना सुरुवातीलाच सांगणं जरुरीचं. निबंधाचा विषय मुलांच्या स्वत:च्या अनुभवविश्वाशी जोडून घेता आलं की, अगदीच अपरिचित विषयावर लिहायचा ताणही येत नाही. केनेस्थेटिक आणि व्हिज्युअल मुलं प्राणीजगतात खूप रमतात. त्यामुळे माझा आवडता प्राणी या विषयावर सांगण्यासारखं त्यांच्याकडे खूप असतं. या संदर्भात नेहमीच्या पद्धतीने मुद्दे न देता, जास्त विस्तृत, त्यांच्या वैयक्तिक अनुभवांशी जोडता येतील असे प्रश्न विचारून त्यांना बोलतं करता येतं. उदा.
०    आवडत्या प्राण्याबरोबर वावरायची संधी मिळाली आहे का?
०    कशी? तेव्हा काय झालं?
०    आवडत्या प्राण्याच्या संदर्भात पुढे जाऊन काय करायला आवडेल?
ही सगळी माहिती कोणत्या क्रमाने सांगितली, तर छान वाटेल यावर त्यांना मदत लागू शकते. हेही हळूहळू सरावाने जमणारे तंत्र आहे. आता सातवीच्याच पुस्तकात ‘शेकरू’ या प्राण्याचा उल्लेख आहे. हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. आता शेकरावर काही माहिती लिहायची झाली तर ती सरसकट पुस्तकातून उतरवून काढता येईल किंवा त्यावर काही वेगळा विचारही करता येईल. यात सर्वात मोठी अडचण म्हणजे मुलांनी शेकरू प्रत्यक्ष पाहिलं असण्याची शक्यता जरा कमीच. पुस्तकात त्याचं रेखाचित्र आहे. पण जमलं तर फोटोग्राफ्स दाखवण्याने आणखी स्पष्ट कल्पना येऊ शकते. काही प्रश्न मुलांपुढे ठेवले तर त्यातून काय साधता येईल पाहूया.
०    शेकरांची संख्या कमी का झाली असावी?
०    शेकरू वाचवण्यासाठी काय करावं लागेल?
०    भीमाशंकर सोडून इतरत्र कुठे तो दिसतो का?
०    शेकरू आपल्याला घरी पाळता येईल का?
०    त्याला प्राणिसंग्रहालयात ठेवता येईल का?
०    महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून शेकराची निवड का झाली असावी?
खरं तर या प्रश्नांची उत्तरं म्हणजे शेकरू या विषयावरचा छोटा निबंधच आहे. असे प्रयत्न वर्गातून झाले तर अनेक मुलांना एकाच वेळी त्याचा फायदा होऊ शकतो. यासाठी शिक्षकाला थोडी जास्तीची तयारी करावी लागते, थोडा अधिक वेळ द्यावा लागतो. मात्र सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाचे (कण्टिन्युअस अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन) निकष हेच तर आहेत. मूल वेगळा विचार कसा करतं? एकेक पायरी पुढे कसं जातं आहे? समजून घेण्याची प्रक्रिया कशी होते आहे, त्यात सुधार होतो आहे का? आधीचे मिळालेले ज्ञान आणि शिकलेल्या नवीन गोष्टी जोडून घेता येत आहेत का? या सगळ्याची उत्तरं शिक्षकाला इथे आपसूकच मिळून जातील.
लर्निग स्टाइल्स आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी लक्षात घेतल्या तर मुलांवर आळशी, टंगळमंगळ करणारा असे शिक्के मारलं जाणं आपोआप टळतंच, पण शिकवणाऱ्यालाही नवे रस्ते सापडत जातात. हा अनुभव शिकणाऱ्यासाठी आणि शिकवणाऱ्यासाठीही अतिशय समाधान देणारा असतो.

No comments:

Post a Comment