Sunday, August 26, 2012

करिअरचे नियोजन आणि आत्मविश्लेषण

अनेक तरुणांची तक्रार असते, की खूप काही करायचं होतं, नेमकं करिअरदेखील ठरवलं होतं, परंतु माहीत नाही कशामुळे, अखेर यश मात्र मिळालं नाही. शेवटी खूप प्रयत्नांनंतर ठरवलेली दिशा सोडून दुसरा मार्ग स्वीकारावा लागला. आपण करायला जातो एक आणि घडतं मात्र भलतंच. किंवा समोर येऊन ठेपतं ते अपेक्षेपेक्षा काही वेगळंच असतं. अशा प्रसंगांना सामोरे जाणारे एक नाही असंख्य तरुण आहेत. कशामुळे? तर कधीही समोर बोट दाखवताना एकच बोट समोर जातं, मात्र तीन बोटं आपल्याकडे असतात. एकच बोट समोरच्या करिअरच्या दिशेकडे नाचवून यश संपादन करता येत नाही, तर सोबत असलेल्या तीन बोटांचाही विचार करावा लागतो. म्हणजेच स्वत:चं विश्लेषण यशस्वी करिअर करण्यासाठी परखडपणे स्वत:ला ओळखणं महत्त्वाचं असतं. यासाठी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील बरेवाईट बारकावे आधीच हेरून ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा आपण आपलीच टिमकी वाजवायचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारच्या कृतीमुळे फाजील आत्मविश्वासात रमायला होत आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोष दुर्लक्षिले जातात आणि चांगुलपणात काही भर पडत नाही. यासाठी करिअर ठरवताना स्वत:ला पूर्णपणे ओळखता आलं पाहिजे. स्वत:चं विश्लेषण करता यायला हवं. एखाद्या व्यक्तीला गुणवत्तेचा अंतिम टप्पा गाठायचा असेल तर त्यासाठी आत्मविश्लेषण पद्धती निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
करिअरचे नियोजन करताना आत्मविश्लेषण या पद्धतीचा निश्चितच उपयोग होतो. यात व्यक्तीची बलस्थानं, त्याच्यातील उणिवा, संधी आणि धोके या सर्वाचा विचार करण्यात आला आहे. या सगळ्याचा विचार केल्याने तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थानं, तुमच्यातील सकारात्मकता समजते. उणिवा लक्षात येताच त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करता येतात. शिवाय समोर येणाऱ्या संधीचा सतत आढावा घेत राहणं आणि करिअरच्या मार्गानं वाटचाल करताना जाणवणारे धोके हे सारं लक्षात घेणंही आवश्यक ठरतं. बदलत्या जगात तुम्ही नेमके कुठे आहात, याची यामुळे जाणीव होते. आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांचे निर्णय घेताना याचा उपयोग होतो.
संबंधित विश्लेषणाचा दोन अंगांनी विचार करायला हवा. तो आपल्या अंतर्गत गुणांशी संबंधित आणि दुसरा आहे तो बाहय़ जगाशी संबंधित. बलस्थानं आणि उणिवा हा अंतर्गत गुणांचा भाग झाला तर संधी आणि धोके यांचा थेट बाहय़ जगाशी संबंध असतो, असे म्हणता येईल.
बलस्थानं- प्रत्येक व्यक्तीत विशिष्ट क्षेत्राशी संबंधित चांगल्या गुणांचं वरदान असतं. या विश्लेषणाद्वारे व्यक्तिमत्त्वाच्या तळापर्यंत पोचून नितळ पाण्याचा झरा शोधून काढावा लागतो. एक कोणतातरी चांगला गुण व त्याच्याशी संबंधित करिअर असं न ठेवता सातत्यानं विविध कौशल्यांचा शोध व त्याला अनुसरून करिअरच्या दिशेची निवड हे प्रत्यक्षात शक्य झालं पाहिजे. माझ्यातली बलस्थानं कोणती? किती मर्यादेपर्यंत आहेत? याचा एकदा मागोवा घेतला की, करिअर निश्चिती हा टप्पा सुलभ होतो.
उणिवा- अनेकदा आपण म्हणतो मला अमूक एक गोष्ट येत नाही, आणि तितक्याच सहजतेनं ती गोष्ट बाजूलाही सारतो. आपल्यातल्या उणिवा आपल्याला सहज शोधता येतात. परंतु नुसतं शोधून थांबता कामा नये तर तटस्थ राहून त्याकडे पाहता आलं पाहिजे. शिवाय लक्षात आलेल्या उणिवांवर मात करण्याचा निर्धार सर्वात महत्त्वाचा ठरतो. करिअरची दिशा निश्चित करताना व त्या दिशेनं वाटचाल कोणत्या उणिवा हा वेग कमी करू शकतील याचा बारकाईनं विचार केला तर त्या उणिवांवर मात करण्याचा विशेष प्रयत्न भविष्यात तुमचा करिअरचा मार्ग निर्वेध करू शकतो.
संधी- प्रत्येक प्रसंग, भेटलेली नवी व्यक्ती, पाहिलेलं ठिकाण, वाचलेलं पुस्तक आणि प्रत्यक्ष क्षण हा एका अर्थानं आपल्या विकासासाठीची एक संधीच असते. गरज असते हे ओळखून पटकन संधीचं सोनं करण्याची. डोळे झाकून रडतखडत कसंतरी काम करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, भविष्यात नेमकं काय पाऊल उचलायची गरज आहे याची उत्तरं जागृतावस्थेतच मिळू शकतात आणि यालाच संधी म्हणतात. संधी सांगून येत नाही. आलेल्या संधीला ओळखता आलं पाहिजे. लगेचच त्याची अंमलबजावणी करता आली तर वेगानं वाटचाल करता येते.
धोका अथवा जोखीम- धोक्याशिवाय भविष्य साकारणं शक्य नाही. प्रत्येक परिस्थितीत एखादा विशिष्ट असा धोका असू शकतो. करिअरची दिशा निश्चित करताना त्याचे फायदे नुसते पाहून चालत नाही तर पुढे जाऊन कोणत्या धोक्यांना सामोरं जावं लागणार आहे, याचाही विचार आधीच करता आला पाहिजे. एखादी अनपेक्षित घटना घडते ती कौशल्यानं कशी हाताळता, याचाही साकल्याने विचार पूर्वीच करावा. नाहीतर एअरहोस्टेसचं करिअर करायचं आहे, परंतु विमानात बसायची खूप भीती वाटते किंवा पोलीस होण्याची इच्छा आहे, परंतु अटीतटीचा प्रसंग समोर येऊन ठाकला तर मग मी हे करिअर सोडून देईन, असं म्हणणाराही तरुणवर्ग आहे. परंतु, अशा म्हणण्याला काहीच अर्थ नाही. संभाव्य धोक्यांचा आधीच विचार करणं आणि त्यावर उपाययोजना आखून ठेवणं ही काळाची गरज आहे.
आत्मविश्लेषणातून अनेकविध चांगल्या बाबी ज्या मला आजपर्यंत दिसल्या नाहीत त्या दिसू शकतात. उणिवा कोणत्या आहेत आणि त्यावर मात कशी करता येईल याचं साकल्यानं नियोजन करता येतं. शिवाय निवडत असलेल्या क्षेत्रात भविष्यात किती संधी आहेत व कोणत्या धोक्यांना सामोरं जावं लागेल याचं संपूर्ण चित्र डोळय़ांसमोर स्पष्ट होतं. तुम्ही आज कोठे आहात, कोणत्या गुणांच्या आधारे भविष्यात कुठे जायचं आहे यासंबंधीचा अचूक निर्णय अशा प्रकारच्या विश्लेषणाद्वारे घेता येतो, म्हणून यशस्वी करिअरसाठी यासंबंधातील वर्तमानातील कृती निश्चितच मदत करते.

No comments:

Post a Comment