फॅशन कोरिओग्राफी

फॅशन कोरिओग्राफी म्हणजे डिझायनरच्या मनातील कल्पना प्रत्यक्ष स्टेजवर उत्तमरीत्या साकारणे. जर तुमच्याकडे असे निर्मितीक्षम मन असेल आणि फॅशनच्या ग्लॅमरस जगात वावरण्याची आवड असेल तर करिअरसाठी फॅशन कोरिओग्राफीसारखा पर्याय निवडायला हरकत नाही.
फॅशन शो म्हणजे कॅटवॉक करीत रॅम्पवर बागडणं, असं आपल्यापैकी कित्येकांना वाटत असेल. प्रत्यक्षात मात्र तो शो आणि तिथले वातावरण प्रेझेंटेबल होण्यासाठी, सादरीकरण नजरेत भरेल असे होण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. आणि त्यासाठी निर्मितीक्षम व्यक्तींची गरज असते. कोणती गोष्ट कशी, कुठे जास्त खुलून दिसेल, याचा नेमका अंदाज असावा लागतो. जर तुमच्याकडे असे निर्मितीक्षम मन असेल आणि फॅशन-ग्लॅमरसारख्या जगात वावरण्याची आवड असेल तर करिअरसाठी फॅशन कोरिओग्राफीसारखा पर्याय निवडायला हरकत नाही. फॅशन कोरिओग्राफी हे करिअर कॅटवॉक कोरिओग्राफी म्हणूनदेखील ओळखले जाते. मुळातच, फॅशनचे विश्व हे नवनिर्मितीक्षम असते. त्यामुळे येथे संधीच्या दृष्टीने मुबलक वाव असतो. इथे नुसत्याच स्पेशलायजेशनच्या संधी नसतात, तर सुपर-स्पेशलायजेशनच्या संधी उपलब्ध असतात. फक्त फॅशनेबल पेहराव तयार करणे म्हणजे फॅशन करिअर इतकाच याचा सीमित अर्थ नाही, तर यात डिझायिनगबरोबर विशिष्ट प्रकारच्या कापडांची निर्मिती, त्यापासून तयार होणारे पेहराव, तसेच ज्वेलरी, चपला-शूज, बॅग्ज् आणि इतर अ‍ॅक्सेसरीज् या सर्व गोष्टींचा त्यात विचार केला जातो. हे क्षेत्र इतके व्यापक आहे की, त्यात फॅशन कोरिओग्राफी, फॅशनसंबंधित पत्रकारिता, सौंदर्य उत्पादनांशी निगडित व्यवसाय आणि मॉडेिलग या सर्व घटकांचा त्यात समावेश होतो.
वर उल्लेखिलेल्या विविध विभागांचे अचूक ज्ञान, आवश्यक ती समज असेल तर फॅशन करिओग्राफी हे तुमच्यासाठी योग्य करिअर ठरू शकते. फॅशन करिओग्राफी म्हणजे डिझायनरच्या मनातील कल्पना प्रत्यक्ष स्टेजवर उत्तमरीत्या साकारणे.
फॅशन/कॅटवॉक कोरिओग्राफीमध्ये दिलेल्या पेहरावात मॉडेल्सने एका विशिष्ट लयीत आणि त्या पेहरावाची व्यावसायिक खुबी लोकांच्या नजरेस पडेल अशा रीतीने चालणे आवश्यक असते. त्यासाठी मॉडेल्सना तसे खास प्रशिक्षण द्यावे लागते. रॅम्पवर जेव्हा मॉडेल चालतात, तेव्हा त्यांच्या मागे डिझायनरने निवड केलेले संगीत वाजवले जाते. या संगीताच्या ठेक्यावर चालण्याच्या विविध पर्यायांचा समावेश या फॅशन कोरिओग्राफीत केलेला असतो. त्यामुळेच फॅशन/कॅटवॉक कोरिओग्राफी ही अत्यंत महत्त्वाची ठरत असते. कारण त्यामधून संपूर्ण शोची संकल्पना, त्याचे सादरीकरण होत असते. व्यासपीठीवर मॉडेल- ती अथवा तो ज्या तऱ्हेने प्रेक्षकांसमोर पेश होतात, त्यावर त्या शोचे यश-अपयश ठरलेले असते. यात एखादी जरी चूक झाल्यास अथवा गलथानपणा दिसल्यास संपूर्ण शो फ्लॉप ठरू शकतो. म्हणूनच संगीताच्या ठेक्यावर मॉडेलचे (ती किंवा तो) लयबद्ध चालणे आवश्यक असते. या चालण्यात एक ऐट असावी लागते. त्याचबरोबर परिधान केलेल्या ग्लॅमरस पेहरावाचे वैशिष्टय़ आणि त्याची व्यावसायिकता सहजतेने नजरेसमोर यावी लागते. त्यामुळेच आजकाल फॅशन शोसाठी व्यावसायिक कोरिओग्राफर्सची निवड करण्याचा ट्रेण्ड विकसित झाला आहे. शिवाय शो यशस्वी ठरण्यासाठी नेमके काय सादर करायचे, याचे त्यांना उत्तम ज्ञान असते.
फॅशन कोरिओग्राफर नेहमी फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट यांच्याबरोबर चर्चा करून, शोची संकल्पना आणि त्याची अंमलबजावणी कशा रीतीने व्हावी, याचे नियोजन करीत असतो. कारण डिझायनर हा या शोमधला महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या डिझाइनमधल्या नेमक्या कोणत्या छटा प्रेक्षकांसमोर आल्या पाहिजेत, हे त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. मोठय़ा स्वरूपाच्या फॅशन शोसाठी डिझायिनग आणि दिग्दर्शन करणे म्हणजे एखाद्या बिग बजेट चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासारखेच आहे. कारण या फॅशन शोमधून कपडय़ांच्या सौंदर्याबरोबर त्यात असलेली सृजनशीलतादेखील रॅम्पवर दिसायला हवी. डिझायनरची क्षमता रॅम्पवर पेश करण्याचे काम कोरिओग्राफरचे असते. त्यामुळेच कोरिओग्राफरला डिझायनरच्या स्टाइलचा, त्याच्याकडे असलेल्या अंगभूत कौशल्यांचा नेमका अंदाज असायला हवा. हा अंदाज असला म्हणजे शोची संकल्पना ठरवणे, त्यातून काय सादर करायचे आहे, हे निश्चित करणे सोपे जाते. कधी कधी नवीन उत्पादन बाजारात दाखल करण्याच्या निमित्तानेदेखील फॅशन शोचे आयोजन केले जाते. फॅशन वीकसारखे कार्यक्रम करताना, त्यावेळी विविध स्वरूपाचे कापड आणि त्यापासून तयार केलेले पेहराव यांवर अधिक भर असतो. त्यामुळे प्रत्येक शोचे वैशिष्टय़ लक्षात घेऊन, त्यानुसार कोरिओग्राफी सादर करावी लागते. त्यामुळे वरकरणी कोरिओग्राफी ही सहज, सोपी प्रक्रिया वाटत असली, तरी ती सातत्याने शिकत राहण्याची प्रक्रिया आहे.
या क्षेत्रातदेखील नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास होत असतो. त्यामुळे दर वेळेस नवी संकल्पना सादर करताना बरेच संशोधन करावे लागते. या संकल्पनेत तोचतोचपणा जाणवणार नाही, याची दखल घ्यावी लागते. मागच्या संकल्पनेपेक्षा नवीन संकल्पना ही पूर्णत: नवी व ताजी वाटली पाहिजे. मुळातच, फॅशन आणि स्त्रिया ही नात्याची वीण घट्ट असल्यामुळे हे स्त्रीप्रधान क्षेत्र समजले जाते. त्यामुळे रॅम्पवर वावरणाऱ्या बऱ्याच मॉडेल मॉडेिलगच्या क्षेत्रात अनेक वष्रे व्यतीत केल्यानंतर फॅशन कोरिओग्राफीकडे वळतात. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना कोरिओग्राफीचे नेमके तंत्र अवगत होते.
फॅशन कोरिओग्राफर म्हणून तुम्हाला करिअर करायचे असेल, तर तुम्ही बारावीपर्यंतचे शिक्षण कोणत्याही विद्याशाखेतून पूर्ण करणे आवश्यक ठरते. या करिअरसाठी खास स्वरूपाचा असा अभ्यासक्रम तयार केलेला नाही. हे शिक्षण तुम्ही एखाद्या नावाजलेल्या आणि अनुभवी कोरिओग्राफरच्या हाताखाली सहाय्यक बनून घेऊ शकतात. फॅशन हा विषय घेऊन पदवी किंवा पदव्युतर शिक्षण पूर्ण केले असेल तर तुम्ही फॅशन कोरिओग्राफर म्हणून करिअर करू शकता. मुळातच या क्षेत्रामध्ये सृजनशीलतेवर भर असल्याने, तुमचे मन जेवढे निर्मितीक्षम असेल तेवढा तुम्हाला या क्षेत्रात जास्त फायदा होईल.
या क्षेत्रात निर्मितीक्षम मन घेऊन वावरताना, कोरिओग्राफरला रंग आणि स्टाइलचे उत्तम ज्ञान अवगत असायला हवे. या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून रॅम्पवर उत्तम मिलाफ साकारता यायला हवा. कोरिओग्राफरकडे संवाद साधण्याचे कौशल्य तसेच संगीताची नेमकी जाण असली पाहिजे. कोरिओग्राफरला रॅम्पवर मॉडेलकडून नेमके काय अपेक्षित आहे, हे त्यांना नीटपणे समाजावून सांगता यायला हवे. कोरिओग्राफरच्या कल्पना जेवढय़ा स्पष्ट असतील तेवढे मॉडेल्सना रॅम्पवर वावरणे सोपे जाते. फॅशन शो जितका सहज, सुंदर नि ग्लॅमरस वाटत असतो, तितका स्टेजमागे ताण अधिक असतो. कधी कधी रॅम्पवर छोटय़ाशा चुकीतून देखील मोठा गोंधळ होऊ शकतो. अशावेळी ती चूक सहजतेने सुधारण्याचे किंवा ती लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने वातावरण तयार करण्याचे प्रसंगावधानही कोरिओग्राफरला असावे लागते. या करिअरमध्ये कार्यालयीन कामासारखे ठराविक व निश्चित वेळेचे बंधन नसते. त्यामुळे कामाच्या अनियमित वेळा आणि प्रचंड तास अशा वातावरणात काम करायची तयारी या कोरिओग्राफरकडे असावी लागते.
फॅशनच्या या निर्मितीक्षम क्षेत्रात मुबलक संधी येतच असतात. डिझायनर्सपासून ते फॅशन ब्रॅण्डपर्यंत सर्वानाच शोच्या यशासाठी फॅशन कोरिओग्राफरची गरज भासते. या शोमधून होणारा लाभ लक्षात घेता अलीकडे या स्वरूपाच्या शोचे आयोजन मोठय़ा प्रमाणावर होऊ लागले आहे. त्यामुळे फॅशन कोरिओग्राफरची देखील मोठय़ा प्रमाणावर गरज भासू लागली आहे. अगदी आजकाल कॉलेज फेस्टिव्हल्सदेखील फॅशन शोशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. इतकेच नाही तर कॉर्पोरेट मनोरंजनपर कार्यक्रमांमध्येदेखील आता फॅशन शो मोठय़ा प्रमाणावर आयोजित केले जातात.
सर्वसामान्यपणे, कोणत्याही फॅशन शोचे यश हे फॅशन कोरिओग्राफरच्या मेहनतीवर अवलंबून असते. एकदा का डिझायनरने त्याच्याजवळील फॅशनेबल पेहरावांचे कलेक्शन आणि त्यासाठी वापरली जाणारी त्याची कल्पना कोरिओग्राफरसमोर मांडली की, त्यानंतर कोरिओग्राफरचे काम खऱ्या अर्थाने सुरू होते. त्यानंतर शोच्या नियोजनापासून तो शो प्रत्यक्षात साकार होईपर्यंत प्रत्येक पायरीवर कोरिओग्राफरचे काम सुरूहोते. उदा. प्रवेश करताना समोरचा देखावा कसा असायला हवा, स्टेज आणि रॅम्पचे डिझाइन कसे हवे, प्रकाशयोजना कशी हवी, दृक्श्राव्य माध्यमाचा वापर कसा करता येईल, मॉडेल्स, त्यांचा मेकअप आणि हेअरस्टाइल्स त्यांच्या पेहरावाला शोभून दिसते की नाही, या सर्व गोष्टी कोरिओग्राफरला पाहाव्या लागतात. त्याचप्रमाणे डिझायनरने डिझाइन केलेले कपडे या शोच्या वेळी प्रामुख्याने नजरेत भरतील, अशी पाश्र्वभूमी आणि प्रेक्षकांची नजर खिळून राहतील, अशी वातावरणनिर्मिती करणे हे देखील कोरिओग्राफरचे महत्त्वाचे काम आहे. 
प्रत्येक व्यक्तीची स्वतची अशी एक खास स्टाइल असते. जरी दोन व्यक्तींनी सारखे पेहराव नि सारखा मेकअप केला तरी त्या दोघांमध्ये असलेल्या स्टाइलमुळे ती दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे उठून दिसतात. त्यामुळेच कोरिओग्राफरला फॅशन शो सादर करताना त्याला एक खास स्टाइल लाभलेली असेल, हे पाहावे लागते. आणि ही स्टाइल त्याने किंवा तिने सादर केलेल्या या आगोदरच्या शोसारखी नसावी. सादरीकरणात तोचतोचपणा येणार नाही, याचे प्रामुख्याने भान फॅशन कोरिओग्राफरने ठेवावे .
फॅशन कोरिओग्राफर्सना नेहमी सृजनशील व्यावसायिक व्यक्तींच्या गटासोबत काम करावे लागते. यामध्ये डिझायनर्स, मॉडेल्स, स्टायलिस्ट आणि फोटोग्राफर्स या सर्वाचा समावेश असतो. कधी कधी कोरिओग्राफर्सही सांघिकरीत्या काम करत असतात किंवा त्यांचे वेगवेगळे समूह तयार असतात, जे कामाच्या वेळी नेहमीच त्यांना सहकार्य करायला तत्पर असतात. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांच्या गटामध्ये सहभागी होऊन, व्यावसायिक कोरिओग्राफर्सना सहाय्य करण्याच्या कामी शिकाऊ उमेदवारांना मदत करता येईल. अशा तऱ्हेने फॅशन कोरिओग्राफर म्हणून तुम्ही स्वतच्या कामाला सुरुवात करू शकाल. मग जसजसा अनुभव गाठीशी जमा होत जाईल, तसतसे तुम्हांला स्वतंत्र किंवा फ्री लान्सर कोरिओग्राफर म्हणून काम करता येईल.
फॅशन कोरिओग्राफरकडे स्वतची प्रशिक्षण संस्था किंवा कोरिओग्राफी संदर्भात प्रशिक्षण देणारी संस्था काढण्याचा देखील उत्तम पर्याय उपलब्ध असतो. शिवाय हल्ली या ना त्यानिमित्ताने फॅशन शो करण्याचे प्रमाणदेखील मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या प्रशिक्षण संस्थांना दिवसेंदिवस चांगलीच मागणी मिळत आहे. तसेच डिझायनर्स किंवा डीलर्सना आपला ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी फॅशन कोरिओग्राफर्सची गरज भासत असते. त्यामुळे ही मंडळीदेखील नेहमी उत्तम कोरिओग्राफर्सच्या शोधात असतात. त्याचबरोबर मॉडेल्स तयार करणाऱ्या एखाद्या प्रशिक्षण संस्थेत सहभागी होऊन या मॉडेल्सना प्रशिक्षण देण्याच्या कामातदेखील तुम्ही सहकार्य करू शकता.
फॅशन कोरिओग्राफर हा करिअरचा उत्तम पर्याय असला, तरीही या व्यवसायाचे काही खास तोटे आहेत, ते लक्षात घेणे आवश्यक ठरते. उदा. इथल्या कामाच्या वेळा आडनिडय़ा असतात आणि कामही भरपूर करावे लागते. एकदा बजेट ठरविल्यानंतर, त्यानुसारच काम करावे लागते. आणि हे काम करीत असताना डिझायनर्स, मॉडेल्स आणि क्लायंट्सचे समाधान होईल, हे देखील पाहावे लागते.
या क्षेत्रात काम करताना मिळणारा मोबदला हा उत्तम असतो, यात शंकाच नाही. विशेष म्हणजे जसजसे तुम्ही अनुभवी होत जाता, तसतसा तुम्ही तुमच्या मागणीनुसार तुमचा मोबदला घेऊ शकता. फॅशन कोरिओग्राफी व्यवसायात जितके तुम्ही यशस्वी व्हाल तितकी तुम्ही भरघोस कमाई करू शकाल. या क्षेत्राचेच वैशिष्टय़च असे आहे की, एकदा का तुमचे नाव झाले की तुम्ही म्हणाल तितका कामाचा मोबदला मागू शकता; मात्र सुरुवातीला तुम्हाला मिळेल ती रक्कम स्वीकारून तुमचे कसब सिद्ध करावे लागते.

No comments:

Post a Comment