बँकेच्या परीक्षांचा मोसम

येत्या दोन महिन्यांत विविध बँकपरीक्षा होणार आहेत. या परीक्षांमधील लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि तयारीसंबंधीचे मार्गदर्शन-
स्पर्धापरीक्षा ही केवळ उत्तम नोकरी मिळावी यासाठी नसते, तर चांगला उमेदवार संस्थेत (सरकारी, खासगी, बँकिंग व इतर) सामावून घेण्यासाठीही असते. प्रत्येक कंपनीला/ बँकेला आपला कर्मचारीवर्ग उत्तम असावा, असे वाटत असते. या स्पर्धेमुळेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत आहेत. बँकभरतीमध्ये होणाऱ्या परीक्षांचा लाभ उमेदवारांना चांगली नोकरी मिळविण्यासाठी निश्चितच होतो, म्हणूनच या परीक्षांना सामोरे जाताना उमेदवारांनी स्वत:ला तयार करायला हवे.
आजही बँकेतील नोकरीचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अबाधित आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात नोकर-कपात चालू असताना बँकिंग क्षेत्रात मात्र सातत्याने नोकर भरती होताना आपण पाहतो. स्थैर्यता, सुरक्षितता या गोष्टींचा विचार करता बँकेतील नोकरीला झुकते माप मिळते. बँकिंग क्षेत्रात खासगी, सरकारी व सहकारी बँका असे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
बँकेतील लिपिकपदावरील भरती प्रक्रिया आज आपण समजून घेऊ. १९ राष्ट्रीयीकृत बँकांसाठी
वर्षांतून दोनदा एकच सामायिक लेखी परीक्षा (CWE-common written exam) घेतली जाते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणपत्रिका  मिळते व त्या आधारे या १९ बँकांमध्ये होणाऱ्या भरतीप्रक्रियेसाठी तो अर्ज करू शकतो. ही गुणपत्रिका एक वर्ष कालमर्यादा ठेवून विद्यार्थ्यांना देण्यात येते. या १९ राष्ट्रीयीकृत बँकांच्या भरतीप्रक्रियेमध्ये स्टेट बँक, रिझव्‍‌र्ह बँक व नाबार्ड यांचा समावेश नाही, तर सहकारी व खासगी बँकांचाही नाही. या बँका आपल्याला हवा असणारा कर्मचारीवर्ग वेगवेगळी परीक्षा घेऊन भरती करतात. यासाठीची पात्रता ही वेगवेगळी असते.
१९ राष्ट्रीयीकृत बँकांसाठी होणारी सामायिक लेखी परीक्षा ही ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत होत असल्याने ही परीक्षा ‘आयबीपीएस’ या नावाने ओळखली जाते. वर्षांतून दोनदा म्हणजेच जून व नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. जूनसाठीच्या परीक्षेचे अर्ज हे साधारणपणे फेब्रुवारी तर नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज हे ऑगस्टमध्ये फक्त ऑनलाइन भरता येतात.
परीक्षेचा अभ्यासक्रम
आयबीपीएस मार्फत होणाऱ्या १९ राष्ट्रीयीकृत बँकांच्या परीक्षेसाठी क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ुड, इंग्रजी, टेस्ट ऑफ रिझिनग (तर्कशक्ती), सामान्यज्ञान (विशेषत: बँकिंग संदर्भातील) व संगणक ज्ञान हे पाच विषय असून प्रत्येकी ५० गुणांसाठी प्रत्येकी ५० प्रश्न विचारले जातात.
अशाप्रकारे एकूण २५० प्रश्नांसाठी १५० मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. लेखी परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत (म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा करणे.) अवलंबविण्यात येते. स्टेट बँकेच्या परीक्षेत मार्केटिंग हा एक अधिक विषय असतो. अन्यथा सर्व अभ्यासक्रम इतर सर्व बँकांसाठी (खासगी, सहकारी, स्टेट बँक, रिझव्‍‌र्ह बँक, नाबार्ड) सारखा असतो.
क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ुड : या घटकात संख्या व संख्याप्रणाली गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, लसावि व मसावि, सरळरूप द्या, नफा- तोटा, शतमान-शेकडेवारी, काळ-काम व वेग, अंतर-वेग व वेळ, मिश्रणावरील उदाहरणे, आगगाडीवरील उदाहरणे, बोट व प्रवाहावरील उदाहरणे, सरासरी अशा उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
टेस्ट ऑफ रिझनिंग : या घटकात शाब्दिक व अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी असे दोन घटक पडतात. अशाब्दिक घटकात आकृतीशी निगडित प्रश्न विचारले जातात. उदा. आकृतींची मालिका पूर्ण करणे, आकृतीशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडणे, समानसंबंध असणारी आकृती शोधणे.
शाब्दिक बुद्धिमापन चाचणी : या घटकात मालिका पूर्ण करणे, आकृतीतील गाळलेल्या जागी योग्य संख्या/चिन्ह/वर्ण पर्यायातून निवडणे, नाते-संबंध, दिशाविषयक प्रश्न, घडय़ाळ व कालमापनावरील प्रश्न इ. प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
इंग्रजी : यात प्रामुख्याने व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, preposition, काळ व त्याची रूपे, उताऱ्यावरील प्रश्न, चुकीचा शब्द/ स्पेलिंग शोधणे, वाक्यातील चूक शोधणे अशा घटकांचा यात समावेश केलेला असतो.
सामान्य ज्ञान : यात बँकिंग क्षेत्राशी संबंधित सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. SLR म्हणजे काय? सध्याचा
रेपो रेट किती आहे? याकरिता आर्थिक घडामोडी संदर्भातील वाचन आवश्यक आहे.
संगणक ज्ञान : आता जवळपास सर्वच बँका या संगणकीकृत झाल्याने, बँकेत नोकरी करणाऱ्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी संगणक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात.
अशा प्रकारे या परीक्षांचा अभ्यासक्रम आखण्यात आला असून योग्य प्रकारे तयारी करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षांमधून बँकेत नोकरी मिळविणे अवघड जात नाही. परीक्षा जाहीर झाल्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच या परीक्षांचा अभ्यास करावा. जेणे करून परीक्षा सोपी वाटेल (अभ्यास कधीच वाया जात नाही) व त्यामुळेच यश मिळण्याची शक्यता दुणावेल.

No comments:

Post a Comment