Sunday, August 26, 2012

सौंदर्याची साधना

गेल्या एक-दोन दशकांपासून शहरी भागातील  युवावर्ग ज्या प्रकारचे करिअर निवडतो, त्यात मोठे आणि वेगाने बदल होताना दिसतात. अगदी आता-आतापर्यंत करिअर निवडण्यासाठी त्यातून मिळणारे उत्पन्न, स्थिरता, समाजात असणारा मान हे निकष होते. आज मात्र त्यात बदल होताना दिसतात.
करिअर वा शिक्षणक्रम म्हणून मान्यता पावलेल्या अशा नाविन्यपूर्ण करिअरमध्ये फॅशन व सौंदर्यसाधना या दोन व्यवसायांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या दोन्ही क्षेत्रातील मागणी आणि त्या तुलनेत संधी आणि पर्यायही वाढले आहेत. यामुळे या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी अद्ययावत व्यावसायिक शिक्षणाची नितान्त आवश्यकता असते. आज स्पा व ग्रूमिंगविषयी ग्राहकवर्ग उत्सुक असल्यानेही या क्षेत्रात निपुणता प्राप्त केलेल्यांना मोठी संधी उपलब्ध आहे.
आज सौंदर्यसाधनेसंबंधातील करिअर हे आर्थिकदृष्टय़ा अत्यंत उत्तम आहे. यात संधींचाही सुकाळ आहे. तसेच तिथे ग्लॅमरही प्राप्त होते. या करिअरमध्ये करिअरचे जे विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यात स्टायलिस्ट म्हणून करिअर साकारण्याची मोठी संधी मिळू शकते. त्याशिवाय केमिकल व कलर ट्रीटमेंटमध्येही तज्ज्ञ बनण्याची संधी मिळू शकते. त्यासोबत न्यूट्रिशन तज्ज्ञ, स्कीन प्रॅक्टिशनर्स, मेकअप आर्टस्टिस्ही बनता येते. त्वचा, केस आणि नखे यांची निगा आणि सौंदर्योपचाराच्या विविध संधी या करिअरमध्ये उपलब्ध होऊ शकतात. मात्र त्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळणे महत्त्वाचे ठरते. अलीकडे प्रशिक्षण घेतानाच कामाचा अनुभव घेण्याची संधीही प्राप्त होते. त्याद्वारे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो.
एफआयसीसीआय-पीडब्ल्यूसीच्या अहवालानुसार, आपल्या देशातील सौंदर्य सेवा विषयक उद्योगाचा आकार ७० अब्ज रुपये असून त्यात नजीकच्या भविष्यकाळात ३० टक्क्यांनी वाढ होईल, हेही सूचित करण्यात आले आहे. हे लक्षात घेतल्यास अनेक उत्तमोत्तम संधी प्राप्त होणाऱ्या क्षेत्रांमध्ये याचा निश्चितच समावेश होऊ शकेल. त्यामागची कारणे पुढीलप्रमाणे आहेत-
१. उत्तम कमाई : देशातील प्रमुख शहरांमधील अग्रगण्य हेअर ड्रेसर्स महिन्याकाठी लक्षावधी रुपये कमावतात. योग्य प्रशिक्षणानंतर नोकरी मिळवलेल्या नवोदित ब्युटी थेरपीस्ट वा हेअर ड्रेसरला ब्रँडेड स्पा/सलूनमध्ये दहा ते १५ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.  दोन वर्षांत हेच वेतन दुपटीहून अधिक वाढते.
२. मोठी मागणी :  पूर्वी केवळ विशेष प्रसंगाकरिताच सलून्स व ब्युटी पार्लर्समध्ये  लोक वळायचे. आता ते नियमितपणे ब्युटी क्लिनिक्स व सलून्समध्ये जाणाऱ्या विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांची संख्या अधिक आहे. यामुळे प्रशिक्षित व्यावसायिकांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात.
३. उगवत्या उद्योजकांकरिता उत्तम संधी : या क्षेत्रात आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करणे फारसे कठीण नसते. मात्र त्याआधी योग्य ठिकाणी आणि पुरेसे प्रशिक्षण आणि कामाचा पूर्वानुभव असणे आवश्यक ठरते.
या क्षेत्रातील उत्तम करिअर प्रस्थापित करण्यासाठी सर्वात आधी उत्तम सौंदर्य प्रशिक्षण संस्था शोधा, ज्यामध्ये चांगल्या प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असतात आणि चांगले प्रशिक्षक असतात. त्या प्रतिष्ठित संस्थेला मान्यता असणे अनिवार्य असते. त्याशिवाय, ही संस्था म्हणजे सुरक्षितता व स्वच्छतेबाबतही उत्तम असायला हवी. अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये न्यूट्रीशन, कॉस्मेटॉलॉजी, मेकअप, स्पा व हेअर असे अभ्यासक्रम उपलब्ध असतात.अशा संस्थांमध्ये कमी कालावधीचा एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापेक्षा पदविका वा पदवी पातळीवरील प्रशिक्षण घ्यावे. तरच त्यातील अद्ययावत व त्यासंबंधातील विविध कौशल्य प्राप्त होते.
आवश्यक कौशल्ये - तुमचे संवाद व सादरीकरण उत्तम हवे: उत्तमरीत्या प्रशिक्षित ब्युटी थेरपीस्ट/ कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा हेअर ड्रेसरकडे उत्तम संवाद कौशल्य असेल तर त्या संस्थेसाठी मोलाचे ठरू शकते. ते ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकतात.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल अशा ट्रीटमेंट/ स्टाईलची शिफारस कशी करावी, ते योग्य प्रकारे स्पष्ट करू शकतात. यामुळे ग्राहकाचा तुमच्यावरील विश्वास वाढतो. तसेच यामुळे ग्राहक निश्चितच दर महिन्याला तुमच्याकडेच येतात.
चांगल्या प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळालेले योग्य प्रमाणपत्र हे या करिअरमध्ये उत्तमरीत्या बस्तान बसविण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते.

No comments:

Post a Comment